रावेरच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांचा महाप्रताप : शासनाचा आदेश धुडकावला : आरटीई प्रवेशाची समितीच गठीत नाही
पालकांकडूनही आर्थिक वसुलीच्या तक्रारी
प्रतिनिधी/रावेर
रावेरचे गट शिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे हे शाळा तपासणीच्या नावाखाली शिक्षकांकडून सक्तीने वसुली करीत असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. याशिवाय कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे, कामकाजात नियोजनशून्यता व प्रशासकीय अकार्यक्षमता या शिंदे यांच्या मनमानी कारभारामुळे शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. त्यात भरीस भर म्हणून याच गट शिक्षणाधिकाऱ्यांचा आणखी एक महाप्रताप समोर आला आहे. सध्या राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणीसाठी प्रत्येक तालुकास्तरावर वीस सदस्यांचा समावेश असलेली पडताळणी समिती गठीत करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र श्री शिंदे यांनी शासनाचा हा आदेश धुडकावला असून ही समितीच गठीत केलेली नाही. स्वताच्या मर्जीप्रमाणे कारभार सुरु ठेवला असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
येथील शिक्षण विभागाचे कार्यालय गुरुवारी कार्यालयीन कामकाज सुरु होण्याच्या वेळेनंतर तब्बल दोन तास म्हणजेच सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कुलुपबंद होते. हा प्रकार आमदार अमोल जावळे यांना समजल्यावर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांना सांगितला. त्यांनी तात्काळ या प्रकाराची दखल घेत रावेरच्या बिडीओंना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. श्री शिंदे यांना याबाबत दोन तासात शोकॉज नोटीस बजावली आहे. दरम्यान गट शिक्षणाधिकारी शिंदे यांचे काळे कारनामे व महाप्रताप संपता संपत नसल्याची चिन्हे दिसत आहेत.
शासकीय आदेश धुडकावला
सध्या राज्यात आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रीये अंतर्गत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जावेळी सादर केलेली कागदपत्रे पडताळणीसाठी २० सदस्यांची पडताळणी समिती गठीत करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. या सामितीचे गटशिक्षणाधिकारी अध्यक्ष असून केंद्रप्रमुख-२, शासकीय शाळेचे मुख्याध्यापक-२, अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक-२, विना अनुदानित शाळेचे मुख्याध्यापक-२, शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी-२, पालक संस्थेचे प्रतिनिधी-२, शिक्षकांचे प्रतिनिधी-२, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी-२, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी-२ व समिती सदस्य सचिव म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी-१ अशा २० सदस्यांचा या समितीत समावेश आहे. मात्र गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी येथे पडताळणी समितीच गठीत न करता स्वत:च्या मर्जीप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत. श्री शिंदे यांनी पडताळणी समिती गठीत करण्याचा शासकीय आदेश धुडकावला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून शासकीय नियम व सेवाशर्तीचा भंग करीत कर्तव्यात कसूर करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अपूर्णता दाखवत मर्जीतल्या “पंटर”च्या माध्यमातून पालकांकडून आर्थिक वसुली करण्याचा प्रकार येथे सुरु असल्याच्या तक्रारी पालकांच्या आहेत याचीही वरिष्ठानी दखल घ्यावी.

krushisewak 
