कृषी विक्रेते आक्रमक : राज्यात २ नोव्हेंबरपासून तीन दिवस कृषी केंद्र राहणार बंद
माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी जाहीर केला निर्णय
जळगाव / प्रतिनिधी
बनावट कृषी निविष्ठा विक्री प्रकरणी कृषी केंद्र चालकांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या व त्यांच्याविरुद्ध एमपीडीए कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. याला कृषी विक्रेता संघटनेने (माफदा) तीव्र विरोध केला आहे. हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यातील ७० हजार कृषी केंद्र चालक २ ते ४ नोव्हेंबर तीन दिवस दुकाने बंद ठेवून संप पुकारणार असल्याचा निर्णय माफदा संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळ यांनी जाहीर केला आहे.
केंद्र सरकारचे कृषी कायदे अस्तित्वात असताना राज्य सरकारकडून आणखी नवीन कायदे लागू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र हे नवीन कायदे कृषी केंद्र चालकांची गळचेपी करणारे असून याला कृषी विक्रेता संघटनेने तीव्र विरोध केला आहे. हे कायदे लागू करू नये या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.
तीन दिवस कृषी केंद्र बंद
या कायद्याला विरोध म्हणून येत्या २ नोव्हेंबरपासून राज्यातील ७० हजार कृषी केंद्र व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टीसाईड, सीड्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) घेतला आहे. २ ते ४ नोव्हेंबर असे तीन दिवस हा संप करण्यात येणार असून या काळात कृषी केंद्रांवरून कोणत्याही प्रकारची कृषी निविष्ठा विक्री केली जाणार नाही तसेच कोणताही कृषी निविष्ठा माल गोडावून मध्ये उतरवला जाणार नाही.
"राज्य सरकारने तयार केलेले कृषी कायदे कृषी विक्रेत्यांवर अन्यायकारक आहेत. यामुळे कृषी निविष्ठा विक्री केंद्रे चालवणे अशक्य होणार आहे. या कायद्याला विरोध असून राज्यातील ७० हजार कृषी केंद्र चालक २ नोव्हेंबर पासून पुकारलेल्या संपात सहभागी होणार आहेत."
विनोद तराळ, अध्यक्ष-माफदा पुणे