रावेर मतदार संघ : माजी आमदार अरुण पाटील यांच्या नाराजीचा फटका कोणाला ? मतदार संघातील राजकीय गणिते बिघडणार का ? मराठा समाज निर्णायक ठरणार का ?

त्यावेळी *जे सुपात* ते *आज जात्यात*

रावेर मतदार संघ : माजी आमदार अरुण पाटील यांच्या नाराजीचा फटका कोणाला ? मतदार संघातील राजकीय गणिते बिघडणार का ? मराठा समाज निर्णायक ठरणार का ?

प्रतिनिधी / रावेर

20 नोव्हेंबर रोजी होणारी रावेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रथमच अतिशय अटीतटीची व राजकीय अंदाज चुकवणारी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात झालेल्या विविध संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांच्या विरोधात राजकीय खेळी खेळत त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा काही राजकारण्यांनी प्रयत्न केला. याचा परिणाम म्हणून माजी आमदार पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारपेक्षा श्री पाटील यांच्या पराभवाचीच अधिक चर्चा त्यावेळी तालुक्यात झाली होती. ही बाब अरुण पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्यांच्या जिव्हारी लागली होती. तेव्हापासून माजी आमदार यांनी सावध पवित्रा घेतला आहे. ते योग्य वेळेची वाट पाहत होते. विधानसभा निवडणुकीत ते फारसे सक्रिय झाल्याचे दिसून येत नाहीत. तसेच त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र त्यांची असलेली नाराजी आता लपून राहिलेली नाही. मराठा समाजजाचे या मतदार संघात प्रॉबल्य आहे. या मतदार संघात या समाजाचा उमेदवार नसल्याने मराठा समाज निर्णायक भूमिकेत असणार आहे. माजी आमदार अरुण पाटील हे मराठा समाजाचे असून त्यांचे समाजात मोठे स्थान आहे. मराठा समाजासह इतर समाजातही त्यांना मानणारा मोठा वर्ग रावेर तालुक्यात आहे. त्यामुळे श्री पाटील आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. माजी आमदार अरुण पाटील यांच्या नाराजीचा कोणत्या उमेदवाराला फटका बसतो व फायदा कोणाला होतो हे सांगणे तूर्त तरी कठीण आहे.

20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीतर्फे भाजपकडून अमोल जावळे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडून धनंजय चौधरी, प्रहार पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी व माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. सध्यातरी चौरंगी वाटणारी ही निवडणूक जसा काळ पुढे जाईल तशी तिरंगी व नंतर दोन उमेदवारात समोरासमोर होण्याची शक्यता आहे. उद्या दि 4 माघारीचा अंतिम दिनांक आहे. अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीतर्फे सर्व पातळीवरून प्रयत्न सुरु आहेत. मात्र याला काही उमेदवार दाद देत नसल्याने नेतेमंडळी हवालदिल झाले आहेत. 

त्यावेळी *जे सुपात* ते *आज जात्यात*

गेल्या पाच वर्षात जिल्हा बँक, बाजार समिती, रावेर तालुका खरेदी विक्री संघासह अन्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी माजी आमदार अरुण पाटील यांना शब्द देऊनही काही नेत्यांनी तो पाळला नाही. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत श्री पाटील यांचा पराभव झाला होता. उलट श्री पाटील यांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते अशी माजी आमदार पाटील यांची भावना आहे. त्यामुळे ते या निवडणुकीपासून सध्या तरी अलिप्त आहेत. माघारीनंतर अरुण पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे मराठा समाजातील मतदारांचे व त्यांना मानणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागले आहेत. त्यावेळी जे सुपात होते ते आज जात्यात आहेत एवढीच प्रतिक्रिया माजी आमदार अरुण पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीबाबत त्यांनी कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र भाऊबीजेदिनी त्यांनी काही गावांना भेटी देऊन मराठा समाजातील नागरिकांशी संवाद साधल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. माजी आमदार यांची नाराजी विधानसभेच्या काही उमेदवाराला परवडणारी नाही. त्यांच्या नाराजीचा फटका या उमेदवारास बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच माध्यमातून माजी आमदार अरुण पाटील जुने राजकीय हिशोब चुकते करण्याची संधी सोडणार नाहीत ही शक्यता नकारता येत नाही. 

लोकसभा निवडणुकीची खदखद 

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार असलेल्या श्रीराम पाटील यांचा झालेला पराभव समाजातील अनेकांच्या पचणी पडलेला नाही. यामागे कोणाचा हात होता याची चर्चा आता उघडपणे मतदारात केली जात आहे. समाजात असलेली पराभवाची खदखद या निवडणुकीत उफाळून येण्याची अधिक शक्यता आहे. प्राबल्य असलेला मराठा समाजात यावेळी ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील तो उमेदवार विजयापर्यंत पोहचेल अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.