BREAKING : अखेर केंद्रप्रमुखावर ओढवली नामुष्की : शरणागती पत्करून शिक्षिकेकडून घेतलेली 50 हजाराची रक्कम केली परत
इतरांचे पैसे केव्हा परत करणार ?
प्रतिनिधी / रावेर
येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील एका केंद्रप्रमुखाने सेवापुस्तक जिल्हा स्तरावरून पडताळणीच्या नावाखाली तसेच एका शिक्षिकेकडून पदवीधर वेतन त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली व कारवाईचा धाक दाखवून थेट 50 हजार रुपयांची वसुली केल्याचा भंडाफोड कृषिसेवक न्यूज नेटवर्कने दोन दिवसापूर्वी केला होता. याची जिल्हास्तरावरून चौकशी सुरु झाल्याचे समजताच स्वतःला दीड शहाणा समजणारा हा केंद्रप्रमुख दोन दिवसात ताळ्यावर आला आहे. शिक्षिकेकडून घेतलेले 50 हजार रुपये परत करण्याची नामुष्कीची वेळ या केंद्रप्रमुखावर आली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता या केंद्रप्रमुखाने अखेर या शिक्षिकेचे 50 हजार रुपये बिनशर्त परत केले आहे. पैसे परत मिळाल्याने सदर शिक्षिकेने कृषिसेवक न्यूज नेटवर्कचे आभार मानले आहेत.
शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी व स्वतःला पुढारी समजणाऱ्या एका केंद्रप्रमुखाने शिक्षकांना कारवाईचा धाक दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली केल्याच्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. पदवीधर वेतन त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली या महाभाग केंद्रप्रमुखाने प्रत्येकी 3900 रुपये प्रमाणे 29 पदवीधर शिक्षकांकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा "मलिदा" जमा केला असल्याच्या तक्रारी आहेत. तर तालुक्यातील एका शिक्षिकेकडून याच केंद्रप्रमुखाने कारवाईचा धाक दाखवत व कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यात कार्यालयातील लिपिकाच्या माध्यमातून तडजोडीअंती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 50 हजार रुपयाच्या रक्कमेची वसुली केली होती. याची माहिती कोणाला देवू नका असा दम भरत कारवाईचा धाक या शिक्षिकेला सदर केंद्रप्रमुखाने दिल्याचा प्रकार घडलेला आहे. याशिवाय आणखी वसुलीची अनेक प्रकरणे या केंद्रप्रमुखाची येत्या काही दिवसात उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कारवाईचा धाक दाखवून व कारवाई टाळण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करीत तडजोडीअंती 50 हजार रुपये घेणाऱ्या केंद्रप्रमुखाविरुद्ध सदर अन्यायग्रस्त शिक्षिकेने याबाबतची माहिती पुराव्यानिशी कृषिसेवक न्यूज नेटवर्ककडे दिली होती. केंद्रप्रमुखाच्या या काळ्या कारनाम्याची बातमी बुधवारी प्रकाशित झाल्यानंतर याची दखल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. सदर प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून "मुजोर" असलेल्या या केंद्रप्रमुखावर अखेर शरणागती पत्करण्याची नामुष्की ओढवली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता रावेर शहरात सदर शिक्षिकेला 50 हजार रुपये परत केले आहे. सुरुवातीला दाद न देणाऱ्या या केंद्रप्रमुखाने लोटांगण घालत आज शिक्षिकेचे पैसे परत केल्याची घटना घडली आहे. मोठ्या प्रमाणावर शिक्षक व शाळांकडून आर्थिक वसुली करणाऱ्या या केंद्रप्रमुखाची या घटनेने नाचक्की झाली आहे.
इतरांच्या पैशांचे काय? केव्हा परत करणार?
कारवाईचा धाक दाखवून शिक्षिकेकडून घेतलेले 50 हजार रुपये परत करण्याची नामुष्की ओढवलेल्या केंद्रप्रमुखाविरुद्धचे व त्याच्या पंटरचे सर्व पुरावे कृषीसेवक न्यूज नेटवर्ककडे उपलब्ध आहेत. सर्व पुराव्यानिशी या केंद्रप्रमुखाची सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे निलंबानाची मागणी करण्यात येणार आहे. एका शिक्षिकेचे पैसे परत केले असून इतरांकडून वसुल केलेल्या पैशांचे काय? ते पैसे केव्हा परत करणार ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
शिक्षकांच्या लढ्याला संघटनेचे पाठबळ
शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी व केंद्रप्रमुखांविरुद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद या संघटनेने अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या निलंबानाची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
कृषिसेवक शिक्षकांच्या पाठीशी
विनाकारण कारवाईचा धाक दाखवत शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अधिकारी व केंदप्रमुखांविरुद्ध कृषिसेवकने निर्भीडपणे व रोखठोकपणे आवाज उठवला असून अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पाठीशी कृषिसेवक न्यूज नेटवर्क कायम उभा राहील.

krushisewak 
