मुक्ताईनगर पंचायत समितीचा भोंगळ कारभार : वर्षापूर्वी बदली होऊनही तिघांना पदभार सोडवेना : नेमणूक झालेले तिघे अधिकारी वर्षभरापासून पदभाराविना
गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील पातोंडी, पिंप्रीपंचम व हरताळा या तीन ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारीपदी राम शिंदे(पातोंडी), संतोष माने(पिंप्रीपंचम) व रोहित बानाईत(हरताळा) यांची वर्षभरापूर्वी मे-२०२५ मध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओंनी काढलेले होते. असे असतांना या तिन्ही ग्रामपंचायतीचा पदभार अद्यापही जुन्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी न सोडल्याने नेमणूक झालेले ग्रामपंचायत अधिकारी वर्षभरापासून पदभारविना आहेत. पदभार न सोडणारे हे तिन्ही ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी असल्याने पंचायत समिती प्रशासनाने याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
मे-२०२५ मध्ये राम शिंदे यांची पातोंडी, संतोष माने यांची पिंप्रीपंचम व रोहित बानाईत यांची हरताळा येथे बदली झालेली आहे. तर त्याचवेळी पातोंडी येथे कार्यरत असलेल्या महेंद्र दुट्टे यांची अंतुर्ली येथे, पिंप्रीपंचम येथील एकनाथ कोळी यांची उचंदा येथे व हरताळा येथील सुभाष खिरोळकर यांची लोहारखेडा येथे बदली झालेली होती. मात्र दुट्टे, कोळी व खिरोळकर यांनी नव्याने बदली झालेल्या गावांचा पदभार स्वीकारला असला तरी जुन्या ग्रामपंचायतीचा पदभार वर्ष होत आले तरी सोडलेला नाही. यामुळे राम शिंदे यांना पातोंडी, संतोष माने यांना पिंप्रीपंचम व रोहित बानाईत यांना हरताळा येथील पदभार स्वीकारता आलेला नाही. महेंद्र दुट्टे, एकनाथ कोळी आणि सुभाष खिरोळकर यांनी तात्काळ नव्याने बदलुन आलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे पदभार सोपविणे बंधनकारक होते. मात्र या तिघांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केला आहे. वर्षभरापासून वरील तिघेच प्रत्येकी दोन ग्रामपंचायतीचा कारभार चालवत आहेत. वास्तविक बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. मात्र या सर्व नियमांना तिलांजली देत जुन्या व नव्या ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक व्यवहार करीत असल्याने शासन सेवासंहितेचा भंग झाला आहे. वर्षभरापासून पदभार न सोडणारे हे तिघेही ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुका व जिल्हा संघटनेचे जबाबदार पदाधिकारी आहेत. म्हणून प्रशासनाचे त्यांना अभय आहे का? की प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्रशासनाने वर्षभर काय पाहिले ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध पंचायत समिती प्रशासन नेमकी काय कारवाई करते हे दिसून येईल.

krushisewak 
