रावेर तालुक्यातून परराज्यात होणाऱ्या खत वाहतुकीवर कारवाई करा : आमदार अमोल जावळे यांच्या कृषी व पोलीस प्रशासनाला सूचना
बैठकीच्या ढिसाळ नियोजनाबाबत आमदारांची नाराजी
प्रतिनिधी/रावेर
रावेर तालुक्यात खरीप हंगामात रासायनिक खतांची टंचाई भासू नये यासाठी कृषी विभागाने वेळीच दखल घेवून नियोजन करावे अशा सूचना करतानाच तालुक्यातून शेजारील मध्यप्रदेशात होणारी खतांचा पुरवठा व वाहतूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई करावी अशी सूचना वजा इशारा आमदार अमोल जावळे यांनी दिला. रावेर येथील तहसील कार्यालयात आमदार जावळे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अधिकारी व उपस्थितांना मार्गदशन करतांना बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षणार्थी उप जिल्हाधिकारी तथा तहसीलदार दीपा जेधे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भंगाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांचा आमदार अमोल जावळे यांनी आढावा घेतला. केळी पिकावर पनामा रोगाचे संकट येवू पाहत असून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना श्री जावळे यांनी कृषी विभागाला व पाल येथील कृषी विज्ञान केंद्राला यावेळी दिल्या.
रावेर तालुक्याला खरीप हंगामात किती मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज आहे, सध्या किती साठा शिल्लक आहे, खतांची मागणीकेली आहे का ? हे प्रश्न बैठकीत आमदार अमोल जावळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारले. मात्र माहितीचा डाटा उपलब्ध नसल्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांना याचे उत्तर देता आले नाही. यावेळी रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील, पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, केऱ्हाळा येथील प्रगतीशील शेतकरी अमोल गणेश पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे ढिसाळ नियोजन
तालुकास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन येथील तहसील कार्यालयाच्या आवारात कृषी विभागाने केले होते. तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सियसपर्यंत असताना बैठकी ठिकाणी पंखे, कुलर, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था कृषी विभागाकडून करण्यात आली नव्हती. केवळ व्यासपीठासाठी एक कुलर लावलेला होता. त्यामुळे बैठकीला आलेले अधिकारी व शेतकरी घामाच्या धारणी ओलेचिंब झाले होते. ही बाब आमदारांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी व्यासपीठाकडे असलेला कुलर बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या दिशेने फिरवण्याच्या सूचना केल्या. कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल आमदार अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त करीत यापुढे असे नियोजन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देत बैठक आटोपती घेतली

krushisewak 
