BREAKING : रावेरमध्ये गुजरातमधील बनावट खतांच्या साठ्यावर कारवाई : गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

भरारी पथकाची कारवाई

BREAKING : रावेरमध्ये गुजरातमधील  बनावट खतांच्या साठ्यावर कारवाई : गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

प्रतिनिधी / रावेर 

जिल्हास्तरीय भरारी पथकाने आज रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधील राजकोट येथून विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. एकूण 28 गोन्या विद्राव्य एन पी के खतांचा हा साठा जप्त करण्याची व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रक भरारी पथकाकडे रावेरचे शेतकरी उदयभान पाटील यांनी बनावट विद्राव्य रासायनिक खत विक्री होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार भरारी पथकाचे प्रमुख पद्मानाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव., जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास बोरसे, तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ललित इंगळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास छोरिया मार्केट मध्ये गुजरात येथील राजकोट वरून आलेल्या ट्रकमधे हा खतांचा साठा आढळून आला. भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी खताच्या गोण्यांची पाहणी केली असता या खताच्या गोण्या विना परवाना व निकृष्ट दर्जाच्या असल्याचे दिसून आले. एकूण 28 गोण्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बनावट खतांच्या गोण्यासह ट्रक पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आला आहे. यापूर्वी याच खतांच्या 5 विविध ग्रेड चे नमुने घेण्यात आले होते, मात्र प्रयोगशाळेतील अहवालनुसार ते निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेला आहे. जप्त खतांच्या गोण्याचा भरारी पथकाने पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.