महाठकाचा महाप्रताप : विवरा येथे रहिवासी जागेवर (एन. ए. प्लॉट) केळीची लागवड दाखवून हडपली विम्याची रक्कम : चौकशीनंतर होणार गुन्हा दाखल
शासकीय दस्तऐवजात फेरफारचा संशय
प्रतिनिधी /रावेर
जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा योजनेअंतर्गत झालेल्या गैरव्यवहाराची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी आक्रमक झालेले आहेत. रावेर तालुक्यात या योजनेत मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्र व शेतकऱ्यांचे परस्पर करारनामे करून स्वतःच्या बँक खात्यात लाखो रुपयांची विम्याची रक्कम वळती करीत ही रक्कम हडपली आहे. तालुक्यातील विवरा बुद्रुक येथील गट नं 1059 या रहिवासी क्षेत्रातील सातबारा उतारे जोडून गावातीलच महाठकाने सातत्याने सातआठ वर्षांपासून केळी पीक विम्याचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्रावून टाकणाऱ्या या प्रकाराने कृषी विभागाचे अधिकारीही आवक झाले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल कृषी विभागाने घेतली असून चौकशीनंतर या महाठकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
केळी पिकाचे हवामानामुळे नुकसान झाल्यास केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई म्हणून विमा योजनेचा लाभ दिला जातो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या माध्यमातून आर्थिक मदत देऊन दिलासा मिळावा हा शासनाचा यामागे हेतू आहे. मात्र शेतकऱ्यांपेक्षा या योजनेत एजंटची मोठी साखळी तयार झाल्याने ही योजना एकप्रकारे या एजंटसाठी कुरण ठरली. आभोडा शिवारात 15 वर्षांपूर्वी मयत असलेल्या महिलेच्या नावावर एकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे 4 हेक्टर क्षेत्रावर 2 लाख 80 हजार रुपयांचा विमा लाटला आहे. यासारखीच असंख्य प्रकरणे कोचूर परिसरात घडलेली असून चिनावल येथील प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावावर परस्पर कोचूरच्या व्यक्तीने स्वतःच्या व पत्नीच्या बँक खात्यात विम्याची रक्कम घेत विमा हडपला आहे. याचीही चौकशी कृषी विभागाकडून केल्यास गावात साळसूद पणाचा आव आणणाऱ्याचा चेहरा शेतकऱ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही.
विवाऱ्यात महाठकाचे काळे कारनामे
तालुक्यातील विवरा बुद्रुक येथील 1973 साली गट नं 1059 हा रहिवासी प्रयोजनासाठी एन ए झालेला आहे. या क्षेत्रावर 31 प्लॉट अस्तित्वात आहेत. त्यापैकी सुमारे 95 टक्के प्लॉटवर घरांचे पक्के बांधकाम असून प्लॉटधारकांचा रहिवास गेल्या 50 वर्षांपासून सुरु आहे. असे असतांना गावातीलच महाठकांनी या प्लॉटचे उतारे देऊन केळी पिक विमा योजनेचा निधी लाटला आहे. हा प्रकार गेल्या पाच सहा वर्षांपासून सुरु असल्याचा संशय आहे. यावर्षी उपग्रहाद्वारे शासनाने केळी लागवडीखालील क्षेत्राची पाहणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या महाठकांनी स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावावर विम्याची रक्कम लाटली असून ही रक्कम कोटींच्या घरात असण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

krushisewak 
