तांत्रिक चूक : एचडीएफसी बँकेच्या चुकीमुळे एन.ए. प्लॉटवर पिक विमा : बँकेने दिले दिलगिरी व्यक्त करणारे पत्र
शेतकऱ्याला विनाकारण त्रास
प्रतिनिधी/ रावेर
तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील गट न. १०५९ या एन. ए. प्लॉटवर केळी पिक विम्याचा लाभ घेतल्याचे पिक विमा कंपनीच्या विमा पॉलिसीमधील नोंदीवरून दिसून आले होते. ही पॉलिसी येथील एचडीएफसी बँकेने काढलेली होती. दरम्यान या क्षेत्रावर संबधितांने कोणताही पिक विम्याचा लाभ घेतला नसल्याचे बँकेच्या निदर्शनास आणून दिले. याची खातरजमा केल्यावर ही बँकेची तांत्रिक चूक झाल्याचे मान्य करीत बँकेने संबधिताला तसे पत्र दिले आहे. बँकेच्या चुकीमुळे मात्र संबधिताला विनाकारण त्रास सहन करावा लागला आहे.
विवरा बुद्रुक येथील गट न १०५९ या एन ए क्षेत्रावर रावेर येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेने केळी पिक विमा उतरवला होता. याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाल्यावर संबधिताने विमा कंपनी व बँकेकडे याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बँकेने माहिती देण्यास टाळाटाळ केली. सातत्याने पाठपुरावा केल्यावर तांत्रिक चुकीमुळे हा विमा उतरवला असल्याचे बँकेने मान्य केले आहे. संबधित शेतकऱ्याला बँकेने दिलगिरी व्यक्त करणारे पत्र दिले असून विमा कंपनीने या क्षेत्रावर काढलेला विमा रद्द केला आहे. बँकेने विम्याची कापलेली रक्कम संबधिताच्या बँक खात्यावर लवकरच परत करण्यात येणार आहे. याप्रकारामुळे मात्र संबधिताला विनाकारण त्रास सहन करावा लागला आहे.

krushisewak 
