रावेर बाजार समितीच्या सभापती पदाचा मान कुणाला ?
रावेर बाजार समिती
येथील बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने १८ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. सभापती व उपसभापती पदासाठी फिल्डिंग लावण्याचे काम महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सुरु झाले आहे. सभापती पदाचा मान कुणाला मिळतो याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
येथील बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी, भाजप शिंदे गट व प्रहार जनशक्ती पॅनलमध्ये झाली. संचालक पदाच्या एकूण १८ जागांपैकी महाविकास आघाडीला १३, भाजप शिंदे गटाला ३ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. बाजार समितीवर महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने सभापती व उपसभापती हे महाविकास आघाडीचे होतील यात शंका नाही. मात्र सभापती पदाची नेमकी संधी कुणाला मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पदाधिकाऱ्यांकडून फिल्डिंग
बाजार समितीच्या सभापती पदाचा पहिला मान मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांतर्फे फिल्डिंग लावण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांची काही पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे. तर पॅनल प्रमुख असलेले माजी आमदार अरुण पाटील, आमदार शिरीष चौधरी व शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील हे या पदासाठी उमेदवार ठरवतील अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.
यांना मिळू शकते संधी
सभापती पदासाठी मंदार पाटील, खिरवडचे राजेंद्र चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील,सचिन पाटील हि नावे चर्चेत आहेत. मात्र राष्ट्रवादीला अधिक जागा असल्याने पहिला दावा या पक्षातर्फे होऊ शकतो. राष्ट्रवादीच्या मंदार पाटील किंवा राजेंद्र चौधरी यांना ही संधी मिळण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील यांना यापूर्वी सभापती पदाची संधी मिळालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असून हे दोन्ही गट नेमकी काय खेळी खेळतात यावर बरेसचे अवलंबून आहे.
भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत
भाजपकडे बहुमताएवढे संख्याबळ नाही. मात्र मंगळवारी जळगाव येथे भाजपचे नेते गिरीष महाजन, आमदार मंगेश चव्हाण व रावेर तालुक्यातील दोन पदाधिकाऱ्यांची सभापती उपसभापती निवडीवर चर्चा झाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीमधील दोन गटांमध्ये असलेल्या वादाचा लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजपवकडून होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीचे विजयी सर्व संचालक विश्वासू असल्याने भाजपचे मनसुबे पूर्णत्वाला येणार नाही असेही काहींचे म्हणणे आहे. भाजपकडे केवळ ३ सदस्य असून बहुमतासाठी १० सदस्य लागतील. त्यामुळे हे गणित जुळून येणे कठीण आहे.