उटखेडा ग्रामपंचायतीचा अजब कारभार : ग्रा प सदस्य अभ्यास दौऱ्यावर, गावकरी वाऱ्यावर

दौऱ्यात महिला सदस्यांच्या नातेवाईकांचा समावेश

उटखेडा ग्रामपंचायतीचा अजब कारभार : ग्रा प सदस्य अभ्यास दौऱ्यावर, गावकरी वाऱ्यावर

प्रतिनिधी / रावेर

रावेर तालुक्यातील उटखेडा येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्य गेल्या दोन दिवसापासून ग्रामपंचायतीला अक्षरशः कुलूप लावून अभ्यास दौऱ्यावर गेलेले आहेत. गावात समस्यांचा डोंगर आ वासून उभा असतांना या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीच्या निधीची अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली उधळपट्टी पदाधिकाऱ्यांकडून सुरु आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

उटखेडा येथील ग्रामपंचायतीच्या गचाळ कारभाराबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. गावात ठिकठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य, अस्वच्छ गटारी, मनमानीप्रमाणे सुरु असलेला कारभार, यासह अन्य तक्रारी नागरिकांच्या आहेत. या तक्रारी सोडविण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. 

गावाला वाऱ्यावर सोडून अभ्यास दौरा 

अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक पाच दिवसाच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. आदर्श गावांना भेटी देऊन आल्यावर या पदाधिकाऱ्यांच्या कामात कितपत सुधारणा होईल? गावाचा कितपत विकास होईल ? हे लवकरच नागरिकांना दिसून येणार आहे. गावात समस्या आ वासून उभ्या असताना ग्रामपंचायत कार्यालयाला अक्षरशः कुलूप ठोकून पदाधिकारी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली "एन्जॉय" करीत आहेत. गावाला वाऱ्यावर सोडून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या या अभ्यास दौऱ्याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विकास कामावर खर्च करण्यासाठी असलेला ग्रामपंचायतीचा निधी या दौऱ्याच्या नावाखाली खर्च करण्याचा "प्रताप" या पदाधिकाऱ्यांनी चालवला आहे. 

दौऱ्यात महिला सदस्यांच्या पतीचा समावेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात व दौऱ्यात निवडून आलेल्या महिला सदस्यांच्या पतीला भाग घेता येत नाही असा शासनाचा नियम आहे. मात्र उटखेडा ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या अभ्यास दौऱ्यात येथील महिला सदस्यांचे पती व कुटुंबियांचा समावेश आहे. ग्रामसेवक शामकुमार पाटील यांनी शासनाच्या या आदेशाची पायमल्ली केली असून नियमाचा भंग केला आहे. याची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व रावेर पंचायत समितीच्या बिडीओ यांनी दखल घेवून ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.