उटखेडा ग्रामपंचायतीची आचारसंहितेला तिलांजली : आचारसंहिता काळात ग्रामपंचायत पदाधिकारी अभ्यास दौऱ्यावर
दौऱ्याच्या चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
प्रतिनिधी / रावेर
नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक 26 जूनला झालेली असली तरी आचारसंहिता 5 जुलैला संपणार आहे. आचारसंहिता काळात स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक लाभ अथवा अभ्यास दौरा काढता येत नाही असे असतांना थेट निवडणूक आयोगाच्याच आचारसंहितेला तडा देत रावेर तालुक्यातील उटखेडा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. आचारसंहिता भंग करीत काढण्यात आलेल्या या दौऱ्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
पावसाळ्याचे दिवस असून या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या पदाधिकाऱ्यांना कोणताही अभ्यास दौरा करता येत नाही. तसेच नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची 5 जुलै पर्यंत आचारसंहिता लागू आहे. यामुळे पदाधिकाऱ्यांना वैयक्तिक लाभ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून घेता येत नाही. उटखेडा ग्रामपंचायत प्रशासन व सदस्यांनी आचारसंहितेला तिलांजली देत या काळात दौऱ्याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे दौऱ्यावर गेलेल्या सदस्यांवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून अपात्रतेची कारवाई होण्याची अधिक शक्यता आहे. तसेच आचारसंहिता भंग केल्याप्रकारणी ग्रामसेवक शामकुमार पाटील यांची चौकशी करण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
गावात दलदल, घाणीचे साम्राज्य
गावात पावसामुळे सर्वत्र दलदल झाली असून बेघर प्लॉट व इतर ठिकाणी चिखल झाला आहे. तसेच गटारी घाणीने भरल्या असून त्यांची स्वच्छता झालेली नाही. ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे. अशी गावाची परिस्थिती असतांना ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी गेल्या चार दिवसापासून अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली एन्जॉय करत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.