चोरवड सीमा तपासणी नाक्यावर वाहनासह 22 लाखांचा गुटका जप्त : रावेर पोलिसांची मोठी कारवाई

गुन्हे शोध पथकाची कामगिरी

चोरवड सीमा तपासणी नाक्यावर वाहनासह 22 लाखांचा गुटका जप्त : रावेर पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिनिधी / रावेर

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा गुटका पोलिसांच्या गस्ती पथकाने चोरवड सीमा तपासणी नाक्यावर बुधवारी मध्यरात्री पकडला आहे. यात 8 लाख रुपयांच्या चारचाकी वाहनासह 14 लाख रुपयांचा गुटका असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना अवैध गुटका वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक डॉ जयस्वाल यांनी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकातील उप निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस कर्मचारी विशाल पाटील, रवींद्र भांबरे यांना चोरवड नाक्यावरून रावेरकडे गुटक्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नाकाबंदी सुरु असतांना रात्री 1:50 वाजता महिंद्रा बोलेरो हे चारचाकी वाहन येताना दिसले. हे वाहन थांबवून चौकशी केली असता त्यात 14 लाख 1हजार 160 रुपयांचा महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला विमल कंपनीचा गुटका आढळून आला. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता बऱ्हाणपूर येथील एका गोडावून मधून हा गुटका दिल्याची माहिती वाहन चालकाने दिली. याप्रकारणी वाहनचालक रिजवान शेख रउफ व त्याचा साथीदार शेख शोएब शेख शरीफ दोघे रा छत्री चौक, पठाण वाडी फैजपूर ता यावल यांच्या विरुद्ध पोलीस कर्मचारी संभाजी बिजागरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहन क्रमांक MH-04-हाय-6515 किंमत 8लाख रुपये व 14 लाख 1हजार 160 रुपयांचा गुटका असा एकूण 23 लाख 1 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस कर्मचारी विशाल मेढे विशाल पाटील, रवींद्र भांबरे, सचिन घुगे, संभाजी बिजागरे यांच्या पथकाने केली आहे.