पडसाद : रावेरला मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन
जालन्याच्या घटनेचा निषेध
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार घटनेचे पडसात रावेर येथे उमटले. शहरातील बऱ्हाणपूर-अंकलेश्र्वर महामार्गावर मराठा समाजाने रास्ता रोको करीत आंदोलन केले. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला.
शहरातून गेलेल्या अंकलेशवर-बऱ्हाणपूर महामार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा समाजातर्फे संध्याकाळी पाच वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी सुरेश चिंधू पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष घनशाम पाटील, प्रशांत पाटील, मराठा समाज विकास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ एस आर पाटील, वामनराव पाटील,दिलीप पाटील, बाजार समिती संचालक गणेश महाजन, पीपल्स बँकेचे संचालक सोपान साहेबराव पाटील, राजेंद्र चौधरी,ललित चौधरी, स्वप्नील पाटील शरद राजपूत यांच्यासह मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसिलदार बंडू कापसे यांना यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.
गृहमंत्र्यांचा निषेध
शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलन कर्त्यावर लाठीमारचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी येथे आंदोलकांकडून करण्यात आली. यावेळी फडणवीस यांचा निषेध करण्यात आला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
दरम्यान पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी एपीआय सिध्देश्वर आखेगावकर, पीएसआय दिपाली पाटील, इस्माईल शेख, राजेंद्र करोडपती या अधिकाऱ्यांसह कर्मचारी तैनात करण्यात आले
होते.