ब्रेकिंग : पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : रावेरला राष्ट्रवादीतर्फे श्रीराम पाटील उमेदवार ?
उद्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
कृषीसेवक न्यूज नेटवर्क
रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी देत आघाडी घेतली आहे. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे हि जागा आल्याने या जागेवर तुल्यबळ लढत देणाऱ्या उमेदवारांची पक्षातर्फे महिनाभरापासून चाचपणी करण्यात येत आहे. आज पुणे येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरू आहे. यावेळी पक्ष श्रेष्ठींनी इच्छुक उमेदवारांशी चर्चा केल्या. उद्योजक श्रीराम पाटील यांना या पक्षातर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. उमेदवाराच्या नावाची घोषणा उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.
आज दुपारपासून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी, जितेंद्र आव्हाड, माजी कृषी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते . पक्षाच्या बैठकीत सर्व इच्छूक उमेदवारांशी चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेतून उमेदवारी कोणाला द्यायची हे सस्पेन्स ठेवण्यात आले आहे. मात्र तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवाराचे नाव उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रावेरच्या जागेबाबतचा सस्पेन्स संपणार आहे.राज्यातील रावेर मतदार संघाकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देत आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून अनेक इच्छुकांची नावे कालांतराने मागे पडत गेली. एड रवींद्र पाटील व उद्योजक श्रीराम पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याचे दिसत होते. मात्र एड रवींद्र पाटील यांच्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार म्हणून उद्योजक पाटील यांच्या नावावर चर्चा करण्यात आली .
उमेदवार म्हणून पाटील यांना मिळणार संधी
रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी शरद पवार गटातर्फे श्रीराम पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे श्री पाटील यांचे नाव उमेदवार म्हणून मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करण्याची अधिक शक्यता आहे.