BREAKING : बनावट सातबारा व खोट्या नोंदीद्वारे शासनाला ज्वारी विक्री करणारे १३३ व्यापारी कारवाईच्या रडारवर : गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
दीड कोटीचा आर्थिक गैरव्यवहार : रावेर तालुक्यातील 31 व्यापाऱ्यांचा समावेश
प्रतिनिधी/रावेर
शेतकरी असल्याचे बनावट सातबारा उतारे व ज्वारीची लागवड केलेली नसतांना खोटी नोंद सादर करून जिल्ह्यातील १३३ व्यापाऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी विकल्याचे एका तपासणीतून उघड झाले आहे. त्यात रावेर तालुक्यातील 31 व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांनी ज्वारी विक्रीद्वारे सुमारे १ कोटी ५८ लाख ८५ हजार ८३७ रुपयांची शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शासन स्तरावरून देण्यात आली आहे. ज्वारी विक्रीसाठी संबधित व्यापाऱ्यांनी शासकीय दस्तऐवजामध्ये खाडाखोड करीत आर्थिक फसवणुक केल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याने शासनच्या खरेदी केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या शेती उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने शासनातर्फे हमी भावाने ज्वारीची खरेदी करण्यात आली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा, व शेंदुर्णी या पाच खरेदी केंद्रावर शेतकरी असल्याचे बनावट सातबारा व ज्वारीची लागवड केलेली नसतांना खोटी नोंद करून १३३ व्यापाऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेवून शासनाची सुमारे दीड कोटीच्यावर रक्कमेची फसवणूक केली आहे. हा प्रकार चौकशीतून समोर आला असून शासनाची फसवणूक करणाऱ्या १३३ व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. रावेर खरेदी केंद्रावर ३१ व्यापाऱ्यांनी, जामनेर येथे १४ मुक्ताईनगर येथे ५९, चोपडा येथे १४ व शेंदुर्णी येथे १५ अशा १३३ व्यापाऱ्यांनी १ कोटी ५८ लाख ८५ हजार ८३७ रुपयांची ४,७१२ क्विंटल ज्वारीची शासनाला विक्री करीत फसवणूक केली आहे. बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई अटळ असून यामुळे संबधित व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शासकीय दस्तऐवजामध्ये खाडाखोड
शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी विक्री करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी शासकीय दस्त ऐवजामध्ये खाडाखोड व फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार तपासणीतून समोर आला आहे. शासनाच्या हमी भाव खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करीत ज्वारीची विक्री केलेली आहे. यामुळे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. शासकीय योजनेचा लाभ घेवून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, शासनाची फसवणूक केलेल्या व्यापाऱ्यांमध्ये प्रकरण मिटवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. रावेरच्या खरेदी केंद्रावर ज्वारी विक्री केलेले ३१ व्यापारी कोण? याची तालुक्यात चर्चा सुरु असून गुन्हा दाखल झाल्यावर खरे चेहरे समोर येणार आहेत. त्यातील काही व्यापारी शुक्रवारी तहसील कार्यालयात दिसून आले.

krushisewak 
