गावपुढाऱ्यांचे धाबे दणानले : रावेरला जुना सावदा रस्त्यावरील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरु
पोलीस बंदोबस्तात निघणार अतिक्रमण
प्रतिनिधी / रावेर
येथील जुना सावदा रस्त्यावरील शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून 20 दुकानांचे पक्के शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जात आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत असून नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे. या अनधिकृत बांधकामाचा भंडाफोड झाल्यावर या दोन्ही विभागांनी तात्काळ दखल घेतली आहे. अतिक्रमित बांधकाम पोलीस संरक्षणात काढून टाकण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्या गावपुढाऱ्यांचे व त्यांच्या साथीदारांचे धाबे दणानले आहे.
येथील जुना सावदा रस्त्यावरील शासकीय जागेवर काही गावपुढारी व स्वयंघोषित समाजसेवकांकडून तब्बल 20 दुकानांचे बेकायदेशीर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जात आहे. शहरातील जागृत नागरिकांनी याची तक्रार केल्यावर याबाबत वृत्त प्रकाशित झाले. शासकीय जागेवर अतिक्रमण करून येथे उभारल्या जाणाऱ्या दुकानाची लाखो रुपयात विक्री करण्याचा अतिक्रमण करणाऱ्यांचा डाव होता. मात्र आता तो फसल्यात जमा झाला आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये यांचा समावेश
शासकीय जागेवर अतिक्रमण करून गाळ्यांचे बांधकाम करणाऱ्यांमध्ये पालिकेच्या माजी पदाधिकारी, राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता, एक ठेकेदार, शहरातील एका नामांकित संस्थेचा कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा, शहरातील दोन व्यावसायिक तसेच एका शासकीय कर्मचाऱ्यासह अन्य व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांच्या संगणमताने हे बेकायदेशीर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरु
या रस्त्यावर होत असलेल्या बेकायदेशीर शॉपिंग कॉम्प्लेक्स अतिक्रमाणाची माहिती नगरपालिकेतर्फे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला पत्राद्वारे देण्यात आली होती. याची दखल घेत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एस बी पाटील यांनी सोमवारी येथे भेट देऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. व त्याचा अहवाल अभियंता पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना दिला. याची तात्काळ दखल घेत साईओ अंकित यांनी नगरपालिकेच्या सहकार्याने पोलीस संरक्षणात अतिक्रमण काढण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी बांधकाम विभागाकडून नगरपालिका व पोलीस विभागाला पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. रविवारी वृत्त प्रकाशित झाल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांनी तात्काळ काम बंद केले आहे.