अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग पूर्वीप्रमाणे रावेर तालुक्यातून जाणार : दिल्लीत महामार्गाच्या प्रगतीबाबत बैठक
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

प्रतिनिधी / रावेर
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नवी दिल्ली येथील शास्त्री भवनातील आपल्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अंकलेश्वर - बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा आढावा घेतला. हा महामार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणारा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग असून, दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी अधिकाऱ्यांना हा महामार्ग रावेर तालुक्यातून वळवण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून कृषी उत्पादनांसाठी, विशेषतः येणाऱ्या केळी क्लस्टरसाठी, व्यापार आणि वाणिज्याच्या संधी वाढू शकतील. मंत्री महोदयांनी प्रकल्पाच्या डिझाईनच्या अंतिम रूपाला गती देण्याची तसेच जमिनीच्या अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्याची आवश्यकता असल्यावर भर दिला.या बैठकीला NHAI भोपाळचे प्रादेशिक अधिकारी श्री. आर. पी. सिंग आणि जळगाव येथील प्रकल्प अधिकारी श्री. शिवाजी पवार यांनी दूरस्थ उपस्थिती दर्शवली.