गटशिक्षणाधिकाऱ्यांचा वसुलीचा आणखी एक फंडा : कारवाईचा धाक दाखवून पोषण आहाराच्या माध्यमातून गोळा केली जाते माया

दोन दिवसात कारवाईची शक्यता

गटशिक्षणाधिकाऱ्यांचा वसुलीचा आणखी एक फंडा : कारवाईचा धाक दाखवून पोषण आहाराच्या माध्यमातून गोळा केली जाते माया

प्रतिनिधी/रावेर 

रावेर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या कथा हनुमानाच्या शेपटीसारख्या दररोज लांबतच चालल्या आहेत. शाळा तपासणीच्या नावाखाली गटशिक्षणाधिकाऱ्यांतर्फे शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या सक्तीच्या वसुलीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्यानंतर आता याच अधिकाऱ्यांबाबत शालेय पोषण आहार तपासणीवेळी कारवाईचा धाक दाखवून प्रत्येक शाळेकडून लाखोंची माया गोळा केली जात असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी पुराव्यानिशी दिल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांनी शाळा तपासणीच्या नावाखाली व शालेय पोषण आहार बाबत कारवाई न करण्यासाठी शिक्षकांकडून घेतलेल्या रक्कमांचे व आर्थिक व्यवहाराचे पुरावे कृषिसेवक न्यूज नेटवर्ककडे उपलब्ध आहेत. हे सर्व पुरावे राज्याचे शिक्षण संचालक, उप संचालक व नाशिक विभागाचे आयुक्तांना सादर करण्यात येणार आहेत. दरम्यान, शिंदे यांच्याविरोधातील तक्रारी पाहता मंगळवारपर्यंत त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

रावेरचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांच्या प्रशासकीय अकार्यक्षमता, नियोजनशून्य कारभार व ढिसाळ नियोजन याबाबत बिडीओ विनोद मेढे यांनी शिंदे यांना गुरुवारी शोकॉज नोटीस बजावली आहे. कार्यालयात उपस्थित न राहता शाळा तपासणीच्या नावाखाली शाळांना एकट्यानेच भेटी देण्याचा व त्यामाध्यमातून शिक्षकांकडून सक्तीच्या वसुलीचा एककलमी कार्यक्रम शिंदे यांनी गेल्या वर्षभरापासून राबवला आहे. शिंदेच्या या कारभाराला त्रस्त झालेल्या शिक्षकांनी अखेर माध्यमाकडे तक्रारी केल्यावर याचा भंडाफोड झाला आहे. तसेच आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी आवशक असलेली समिती गठीत न करता स्वतःच्या मार्जिप्रमाणे शिंदे यांनी कारभार केला आहे. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून बॅकडेटेड समिती तयार करण्याची शिंदे यांनी केलेली हुशारी कृषिसेवक न्यूज नेटवर्कने पुन्हा हाणून पाडली आहे. 

कारवाईचा धाक दाखवून वसुली

गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याकडेच शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचाही पदभार आहे. कधी शाळा तपासणीच्या नावाखाली सक्तीची वसुली तर कधी त्याच शाळेत शालेय पोषण आहार तपासणीतून कारवाईचा धाक दाखवून शिक्षकांची आर्थिक पिळवणूक गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. शालेय पोषण आहारात मुद्दामहून त्रुटी काढून कारवाईचा धाक शिंदे यांच्याकडून दाखवला जातो. व कारवाई टाळायची असेल तर "मागणी" पूर्ण करण्याचे सांगितले जाते. यापोटी 5 ते 20 हजारापर्यंत सोयीनुसार व तडजोडीतून माया गोळा केली जात आहे. आतापर्यंत शिंदे यांनी वसुलीच्या माध्यमातून लाखोंची "माया" गोळा केली असल्याची शिक्षकांमध्ये उघडपणे चर्चा सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून शिंदे यांच्याकडे असलेले गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक या दोन्ही पदांचे पदभार काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, सेवापुस्तक पडताळणीच्या नावाखाली शिक्षकांची लूटमार करणारे "ते" केंद्रप्रमुख चौकशीच्या रडारवर आहेत. 

सूचना : शाळा तपासणीच्या नावाखाली वसुलीच्या बातम्या कृषीसेवक न्यूज नेटवर्ककडे असलेल्या सबळ पुराव्याच्या (रक्कमा स्वीकारतानाचे व्हिडीओ व फोटो )आधारे प्रकाशित करण्यात येत आहेत. यात आपली बदनामी होत आहे असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी रावेर न्यायालयात जावे. न्यायालयासमोर याबाबतचे सर्व पुरावे सादर करून उत्तर दिले जाईल.