ब्रेकिंग : रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
पक्ष बळकटीकरण करण्यावर दिला जाणार भर
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी ऍड रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मुक्ताई शुगर मीलच्या चेअरमन रोहिणी खडसे यांची आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार महिला प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आज पक्षातर्फे मुंबईत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या माध्यमातून त्यांच्यावर राज्य पातळीवरील मोठी जबाबदारी टाकण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या नियुक्तीबद्दल रोहिणी खडसे यांचे शरद पवार, सुप्रील सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, विद्या चव्हाण, एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, अरूण गुजराथी आदींसह पक्षाचे नेते आणि पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतांना रोहिणी खडसे यांनी देखील त्यांच्या सोबत हाती घड्याळ बांधले होते. मध्यंतरी त्यांना पक्षात मोठे पद मिळणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. यातच पक्षात फूट पडून अजितदादा पवार गट स्वतंत्र सत्तेत सहभागी झाल्यामुळे ही चर्चा मागे पडली होती. तथापि, आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.