रावेर तालुक्यात दररोज 30 लाखांच्या गुटक्याची तस्करी : गुटका माफियाकडून 12 लाखाची कर चुकवेगिरी

अवैध वाहतुकीला आळा घालणार कोण?

रावेर तालुक्यात दररोज 30 लाखांच्या गुटक्याची तस्करी : गुटका माफियाकडून 12 लाखाची कर चुकवेगिरी

प्रतिनिधी/रावेर 

बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश)येथून दररोज सुमारे 30 लाखाचा गुटखा अवैधरीत्या रावेर तालुक्यात वाहतूक केला जात असून तो संपूर्ण जिल्ह्यात विक्री केला जात आहे. गुटक्यावर महाराष्ट्रात बंदी असतांना मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध वाहतूक रात्रंदिवस बिनबोभाटपणे सुरु आहे. गुटक्यावर शासनाचा 40 टक्के जिएसटी कर लागू आहे. मात्र बऱ्हाणपूर येथून रावेर तालुक्यात वाहतूक केल्या जाणाऱ्या 30 लाखाच्या गुटक्यावरील शासनाचा अंदाजे 12 लाखांचा जिएसटी कर दररोज बुडवला जात आहे. याची संबंधित विभागाने दखल घेवून जिएसटी कर बुडवून अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महाराष्ट्रात गुटका विक्री, वाहतूक व साठवणुकीवर बंदी आहे. असे असतांना बऱ्हाणपूर येथून रावेर तालुक्यात दररोज मोठया प्रमाणावर गुटक्याची अवैधरीत्या सर्रास वाहतूक सुरु आहे. बऱ्हाणपूर व वलसाड येथून रावेर तालुक्यात हा गुटका सराईतांकडून दररोज विक्रीसाठी आणला जात आहे. बऱ्हाणपूर येथून येणारा गुटका रावेर तालुक्यात वाहतूक व विक्री करणारी सुमारे 50 एजंटची मोठी टोळी सक्रिय आहे. 

दररोज 12 लाखांच्या जिएसटीची कर चुकवेगिरी 

मध्यप्रदेशात गुटका विक्री वाहतूक व साठवणुकीला परवानगी आहे. मात्र महाराष्ट्रात यावर बंदी असताना मध्यप्रदेशातील काही व्यापाऱ्यांकडून छुप्या पद्धतीने दररोज रावेर तालुक्यात गुटका पाठवला जात आहे. मध्यप्रदेशातील ओम ट्रेडर्स, श्री ट्रेडर्स, मोहित ट्रेडर्स यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांकडून दररोज सुमारे 30 लाखांचा गुटका रावेर तालुक्यात पाठवला जात आहे. हा गुटका संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वितरित केला जात आहे. अवैधरीत्या वाहतूक केल्या जाणाऱ्या गुटक्यावर असलेला 40 टक्के जिएसटी कर चुकवला जात असून दररोजची ही रक्कम अंदाजे 12 लाखापर्यंत आहे. महिन्याकाठी कर चुकवेगिरीचा हा आकडा कोटीमध्ये जातो. जिएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरीत्या वाहतुकीद्वारे कर चुकविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. 

*(क्रमशः उद्या वाचा -रावेर तालुक्यातील गुटका तस्करीतील गावनिहाय एजंटची नावे )*