ब्रेकिंग : नाशिकच्या सिव्हिल इंजिनिअरचे काळे कारनामे : भाडयाने घेतलेली गाडी विकून रावेरच्या एकाची दीड लाखात फसवणूक

रावेर पोलिसांची कामगिरी : नाशिकमधून तिघांना अटक : वाहन जप्त

ब्रेकिंग : नाशिकच्या सिव्हिल इंजिनिअरचे काळे कारनामे : भाडयाने घेतलेली गाडी विकून रावेरच्या एकाची दीड लाखात फसवणूक

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये टॉपर असलेल्या नाशिकच्या एका युवकाने ऑनलाईन खेळातून झालेले कर्ज फेडण्यासाठी भाड्याने चारचाकी वाहन घेतले. मात्र हे वाहन रावेरच्या सतीश बारी यांना विक्री करीत त्यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले. आठ दिवसांनी विक्री केलेले वाहन याच युवकाने रात्रीच्या वेळी रावेरमधून चोरून नाशिकला नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी वाहनासह तिघांना अटक केली आहे.   

रावेर येथील बऱ्हाणपूर रस्त्यावरील समर्थ मोटर्स गॅरेजचे मालक सतीश बाबुराव बारी यांचा चारचाकी वाहन दुरुस्ती व खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ३ नोव्हेंबरला सतिष बारी यांना त्यांच्या मोबाईलवर शिवकुमार जयराम मुरगन रा नाशिक रोड याने फोन करुन होन्डा कंपनीची जाज चारचाकी वाहन (MH 04 GZ 1343) विक्री असल्याचे सांगितले. शिवकुमार जयराम मुरगन (वय ३०) रा खोले माळा, अटलरी चौक, जय भवानी चौक, नाशिक याने अमित कैलास बुरकुल (वय ३१) रा दिपज्योती रो हाऊस, हिरावाडी, पंचवटी नाशिक व सुमीत अशोक धाईजे (वय २६) रा हनुमंतनगर लोखंडे मळा, जेल रोड नाशिक यांच्याशी संगनमत करुन सदर गाडी मुळ मालकाकडुन भाड्याने घेतली. त्यानंतर हि गाडी बारी यांना दाखवून विक्री करायची असल्याचे सांगितले. गाडीचा मूळ मालक दवाखान्यात असल्याचे सांगून गाडी मालकाचे बनावट पॅनकार्ड देऊन विश्वास संपादन केला. वरील तिघांनी बारी यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये फोन पे व रोख स्वरुपात  स्विकारुन गाडी बारी यांच्या ताब्यात दिली. मात्र यातील अमित बुरकूल याने पाच सहा दिवसानंतर नाशिक येथून येऊन बारी यांच्या घरासमोर उभी असलेली गाडी चोरुन नेली होती. याबाबत सतीश बारी यांनी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वाहनासह आरोपी ताब्यात 

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोलीस कर्मचारी सुनिल वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांनी नाशिक येथे जावून  चोरी झालेल्या वाहनासह वरील तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात अली आहे. आरोपीना पाच दिवस (दि. २२ पर्यंत) पोलीस कस्टडी देण्यात अली आहे. 

आरोपी सिव्हिल इंजिनिअरिंगचा टॉपर विद्यार्थी 

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी अमित कैलास बुरकूल हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा पदवीधर असून तो नाशिकमधील एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा टॉपर विद्यार्थी आहे. मात्र तो पैशांच्या हव्यासापोटी मोबाईलवरील ऑनलाईन खेळ खेळत होता. त्यातून त्याच्यावर कर्ज झाले होते. ते फेडण्यासाठी त्याने हा मार्ग पत्करला आहे. त्याला दोन्ही मित्रांनी साथ दिली.