केळी पिक विम्याच्या घोटाळा प्रकरणी चार सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
सुमारे पावणे पाच कोटींचा घोटाळा
प्रतिनिधी / रावेर
शासनातर्फे रावेर तालुक्यात 2025-26 या वर्षात राबविलेल्या अंबिया बाहर केळी पिक विमा योजनेत सुमारे 4 कोटी 74 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चार सीएस सी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.तर निंभोरा परिसरातील दोन जण अजून पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षी रावेर तालुक्यात विमा कंपनीतर्फे केळीसाठी अंबिया बाहर विमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांतर्फे सहभाग नोंदवला जातो. पिक विम्याचा अर्ज सीएससी सेंटर मार्फत पिक विमा कंपनीकडे सादर केला जातो. मात्र एमआरसाक प्रणालीने केलेल्या पडताळणीत रावेर तालुक्यातील 962 हेक्टरवर केळी पिक आढळून आलेले नाही. त्यामुळे या क्षेत्रावरील पिक विमा जास्तीचा आढळून आला आहे. रावेर तालुक्यातील जयेश कोळी रावेर, विजय पाटील तमासवाडी, प्रफुल्ल सराफ रावेर व हर्षल पाटील अटवाडा या सीएससी सेंटर चालकांनी शासनाचा विश्वासघात करून फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आज रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिक विमा घोटाळ्यातील अनेक चेहरे पोलीस चौकशीतून समोर येणार आहे. पिक विम्याच्या घोटाळ्या गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पिक विम्यात अनेकांचे हात ओले
दरम्यान, क्षेत्रावर केळीची लागवड नसताना खोटे सातबारा उतारे जोडून सीएससी सेंटर चालकांनी पिक विमा काढल्याचे शासकीय तपासणी व पडताळणीत उघड झाले आहे. या प्रकरणात अनेकांचे हात ओले झाले असून पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. या चौकशीतून अनेकांचा चेहरा समोर येणार आहे.

krushisewak 
