जादा दराने बियाणे विक्री आढळ्यास कारवाई : कृषी अधिकारी एल ए पाटील यांचा इशारा

खरीप हंगाम पूर्वतयारी

जादा दराने बियाणे विक्री आढळ्यास कारवाई :  कृषी अधिकारी एल ए पाटील यांचा इशारा

रावेर / प्रतिनिधी 

येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून बियाणे व रासायनिक खतांची कमतरता जाणवू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. कापूस लागवडीसाठी रावेर तालुक्यात १८ हजार ११५ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. तालुक्यात केळी खालोखाल कापसाची लागवड करण्यात येते. येत्या खरीप हंगामाची पूर्व तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. तर कृषी विभागानेही नियोजन केले आहे. 

असे आहेत कापूस पाकिटाचे दार 

नॉन बीटी १ संकरीत कापूस पाकिटाचा दर ६३५ रुपये असून  बीटी-२ संकरीत कापूस पाकिटाचा दर ८५३ रुपये एवढा केंद्र शासनाने निश्चित केलेला आहे. प्रत्येक पाकिटाचे वजन ४७५ ग्रॅम निश्चित करण्यात आले आहे. 

९०,५७५ बियाणे पाकिटांची नोंदणी  

 रावेर तालुक्यासाठी कापूस बियाण्याचे नॉन बीटी कापूस १,६३० पाकिटे व बीटी संकरीत कापूस ८८,९४५ अशी एकूण ९०,५७५ पाकीटांची नोंदणी जिल्हा स्तरावर नोंदविण्यात आली आहे. त्यात राशी ६५९, राशी ५७८, कावेरी जादू, मनिमेकर व एटीएम, अजित १५५ व १९९, आतिश ५३६०, निजिवुडू भक्ति या वाणांचे कापूस बियाणे उपलब्ध होणार आहे. 

तर विक्रेत्यांवर कारवाई 

कापूस व इतर बियाण्यांची तसेच खतांची जादा दराने विक्री होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषि केंद्रांवरून रीतसर पक्के बिल घेऊन बियाणे खरेदी करावे, ज्यादा दराने विक्री होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कापूस लागवड १ जूननंतर करावी.  

७,७०५ मेट्रिक टन खत शिल्लक 

रावेर तालुक्यात युरिया २५३६, पोटॅश सुफर फॉस्पेट ३५६०, डीएपी ३४६, अमोनियम सल्फेट १३८, संयुक्त खत १०.२६.२६. - ३१२, इतर २०७, सिंगल संयुक्त खते ४३६, इतर खते १७० असे एकूण ७,७०५ मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे. तालुक्याची एकूण मागणी ४१,६६७ मेट्रिक टन असून खरीप हंगामात पूर्ण पणे खतांचा पुरवठा होणार आहे, तशी मागणी जिल्हा स्तरावर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनी अधिकृत खत केंद्राकडून आधार कार्ड व अंगठा देऊन ई पॉस मशीन द्वारे खते खरेदी करावी असे कृषि अधिकारी  एल. ए. पाटील यांनी आवाहन केलेले आहे.